Home क्राईम पहिले बिर्याणी, मग कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

पहिले बिर्याणी, मग कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 


मुंबई-वृत्तसेवा । मुंबईत सलग दोन धक्कादायक घटनांनी शहर हादरलं आहे. पायधूनी परिसरात अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायधूनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री उशिरा नातेवाईकांसह जेवण केले होते. जेवणानंतर त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याचे समोर आले आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत गेल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेत अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या दोन मुली आयशा (16) व झैनब (13) यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले, तर काही तासांतच पालकांचाही मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्यांनी आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. या घटनेमुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः कलिंगडामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळी सर्वात आधी पोहोचलेल्या शेजारी डॉक्टर कुरेशी यांनी सांगितले की, चौघेही घरात बेशुद्ध अवस्थेत पडले होते आणि घरभर उलट्यांचे चिन्ह दिसत होते. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात हलवले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. शरीरात विषारी परिणाम झाल्याचे संकेत दिसत होते, असेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound