Home राजकीय भाजप बकासुरांचा पक्ष : खासदार संजय राऊत

भाजप बकासुरांचा पक्ष : खासदार संजय राऊत


मुंबई-वृत्तसेवा । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत पक्षफोडीच्या राजकारणावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न करत असून विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी “बकासुराचा अंत झाला आहे” असा टोला लगावला. 29 एप्रिलला शिवसेना प्रकरणावर सुनावणी झाली नाही, तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊत यांनी न्यायालयीन प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त करत, “जर कोर्टाकडे आमचे म्हणणे ऐकण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबांकडे जावे का? त्यांनाच आमचे वकील करून कोर्टात आणावे का?” असा उपरोधिक सवाल उपस्थित केला. शिवसेना प्रकरणात केवळ तारखांवर तारखा पडत असून न्याय मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

राज्यातील सत्ताधारी गटांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील किती आमदार भाजपमध्ये जातील, हे पाहायला मिळेल. “आमच्यावरही पक्ष सोडण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. मला अटक झाली, तरी पक्ष सोडण्याचा दबाव होता. मात्र आम्ही झुकलो नाही, जेलमध्ये जाणे पसंत केले,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या अनुभवांचा दाखला दिला.

भाजपवर टीका करताना त्यांनी “ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते घाबरून पक्ष बदलतात. विरोधक कमजोर होत नाहीत. गेलेले लोक लोकनेते नाहीत. भाजपचा कचरा डेपो झाला आहे,” अशी बोचरी टीका केली. भाजपमध्ये जाणाऱ्यांवर ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे पक्षांतर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आम आदमी पक्षातील सात राज्यसभा खासदारांच्या भाजप प्रवेशावर बोलताना राऊत म्हणाले, “कालपर्यंत भाजपला गुंडांची पार्टी म्हणणारे आज भाजपमध्ये गेले. ईडीच्या रेडनंतरच हे पक्षांतर झाले. भाजप बकासुरासारखा पक्ष झाला आहे, ज्याचे पोट कधीच भरत नाही.” महाभारतातील बकासुराचे उदाहरण देत त्यांनी भाजपवर सत्तालालसेचा आरोप केला.

राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. “या क्षणी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नाही. त्यामुळे आम्हाला बागेश्वर बाबांच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रकरणातील सुनावणीवरून त्यांनी न्यायालयालाही प्रश्न विचारले. “शिवसेनेबाबत सुनावणी घेण्यासाठी कोर्टाला वेळ नाही, मग इतके महत्त्वाचे काम काय आहे?” असा सवाल त्यांनी केला. पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

दरम्यान, राऊत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या राजकारणात नवे संकेत मिळत असून, 29 एप्रिलच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप-उबाठा संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound