नवी दिल्ली-वृत्तसेवा । देशाच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली असून आम आदमी पार्टीला (आप) जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे तब्बल सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा झाल्यानंतर ‘आप’मध्ये खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
राघव चड्ढा यांनी शुक्रवारी (२४ एप्रिल) पत्रकार परिषदेत मोठा निर्णय जाहीर करताना सांगितले की, ते आणि पक्षाचे इतर सहा राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. या घोषणेमुळे ‘आप’च्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चड्ढा यांनी पक्षावर टीका करताना म्हटले की, “हा आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “भाजपने पुन्हा एकदा पंजाब्यांशी अन्याय केला आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये राघव चड्ढा, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत सिंह साहनी आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या निर्णयामुळे ‘आप’ला मोठा राजकीय फटका बसला असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर गंभीर आरोप करत ‘ऑपरेशन लोटस’चा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, “आमच्या खासदारांना फोडण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्यावर ईडीचा छापा पडला होता. या सर्व घटना परस्पर संबंधित आहेत. दबाव टाकून आणि भीती दाखवून आमचे खासदार भाजपमध्ये सामील करून घेतले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
राघव चड्ढा यांनी मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन करत सांगितले की, “मी पक्षात बदल घडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला त्यांच्या कार्यपद्धतीशी सहमत होता आले नाही. मला त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा भाग व्हायचे नव्हते. त्यामुळे आमच्यासमोर दोनच पर्याय होते—राजकारण सोडणे किंवा सकारात्मक राजकारणासाठी पुढे जाणे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला.”
या संपूर्ण घडामोडींमुळे देशातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘आप’साठी हा मोठा धक्का मानला जात असताना भाजपसाठी ही मोठी राजकीय वाढ मानली जात आहे. येणाऱ्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.



