Home क्राईम मनपात ‘अटलांटा कन्स्ट्रक्शन’ मोठा घोटाळा? पोलिसांकडून कागदपत्रांची सखोल पडताळणी

मनपात ‘अटलांटा कन्स्ट्रक्शन’ मोठा घोटाळा? पोलिसांकडून कागदपत्रांची सखोल पडताळणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी प्रक्रियेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. प्रकरणात मोठी खळबळ उडाली असून, संभाव्य ४१ कोटी रुपयांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी महापालिकेत येऊन कागदपत्रांची सखोल तपासणी केली. मनपा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी २२ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेग आला आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने जळगाव शहर पोलीस स्टेशनकडून २३ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक महापालिकेत सकाळी ११ वाजेपासून दाखल झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान नगररचना आणि शहर अभियंता विभागातील विविध नोंदी, करारपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती पडताळण्यात आली.

तक्रारीनुसार, अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीला सन १९९७ मध्ये जळगाव नगरपरिषदेकडून रस्ते डांबरीकरण प्रकल्पासाठी कंत्राट देण्यात आले होते. मात्र कंपनीने कंत्राट मिळवताना आवश्यक तांत्रिक क्षमता नसताना तसेच आर्थिक अटी पूर्ण करण्याची तयारी नसताना चुकीची व भ्रामक माहिती सादर करून हे कंत्राट मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, कंपनीला मोबिलायझेशन अॅडव्हान्स म्हणून सुमारे १० कोटी ३५ लाख रुपये देण्यात आले होते.

तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने कंत्राटानुसार काम वेळेत पूर्ण केले नाही. वारंवार मुदतवाढ घेत काम अपूर्ण ठेवण्यात आले असून, प्रकल्पासाठी दिलेली रक्कम इतरत्र वळविल्याचा ठोस संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कंपनीकडे महापालिकेची सुमारे ४ कोटी ७९ लाख ४२ हजार ४४४ रुपये इतकी मूळ थकीत रक्कम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

या थकीत रकमेवर सन २००२ पासून आजपर्यंत ९ टक्के चक्रवाढ व्याज धरल्यास एकूण नुकसान सुमारे ४१ कोटी ३४ लाख ११ हजार ५६२ रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी नगररचना व शहर अभियंता विभागाला भेट देत पत्रात विचारलेल्या मुद्द्यांवर आधारित स्पष्ट अभिप्राय आणि उपलब्ध कागदपत्रांच्या छायांकित प्रती मागवल्या आहेत. या प्रकरणातील सर्व माहितीची सखोल पडताळणी करून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शहर अभियंत्यांना दिल्या आहेत.

 


Protected Content

Play sound