सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण धोरणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रेशनिंग दुकानांचे संचालन महिला बचतगटांकडे सोपविण्याची मागणी पुढे आली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रोहन धुगे यांच्याकडे यासंदर्भात निवेदन देत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची विनंती केली आहे.
सारीका चव्हाण यांनी जिल्ह्यातील रेशनिंग दुकानांची माहिती घेतली असता काही दुकाने तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याचे तसेच काही दुकाने मयत व्यक्तींच्या नावावर असून ती इतर रेशनिंग धारकांकडे जोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर अशा बंद किंवा तात्पुरते रद्द करण्यात आलेल्या रेशनिंग दुकानांचे संचालन महिला बचतगटांकडे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी रोहन धुगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका दर्शवली. लवकरच शासनस्तरावर निर्णय घेऊन महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच महिला बचतगटांना शासनाच्या विविध नवीन योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निवेदनाची प्रत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रीछगन भुजबळ यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



