Home धर्म-समाज किनगावात विराट हिंदू संमेलनाचा जल्लोष 

किनगावात विराट हिंदू संमेलनाचा जल्लोष 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाला बुधवारी (दि.२२) सायंकाळी मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सकल हिंदू समाज किनगाव व चिंचोली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात पंचक्रोशीतील समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.

किनगावच्या बाजीराव नगरातील प्रशस्त प्रांगणात पार पडलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत पाटील होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून भटके विमुक्त विकास परिषद देवगिरी प्रांतचे कार्यकारीणी सदस्य विकासजी लोहार (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा), आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुल चिंचोलीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. योगीराजजी महाराज, स्वामीनारायण मंदिर मालोद येथील पूज्य कोठारी प्रेमप्रकाश दासजी महाराज तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धिक मंडळ सदस्य पंकजजी शिंदे (चोपडा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम सादर करण्यात आले. अंतरा प्रकाश पाटील या लहान मुलीने सादर केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाज एकजूट, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक परिवर्तन यावर भर दिला.

यावेळी पंकजजी शिंदे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. संघाची स्थापना १९२५ साली झाली असून यावर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याने देशभरात अशा विराट हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग तेली यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन विश्वदीप पाटील यांनी व्यक्त केले. शेवटी ह.भ.प. योगेश महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Protected Content

Play sound