जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांत आर्थिक आघाडीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून, समितीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, बाजार समितीने खर्च वजा जाता लाखांच्या घरात नफा कमावला आहे. अशी माहिती सभापती सुनील महाजन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
आर्थिक स्थितीचा आढावा:
समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन २०२३-२४ मध्ये समितीचे उत्पन्न ७ कोटी १८ लाख रुपये होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ९ कोटी ९५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्व खर्च वजा जाता समितीकडे ९१ लाख ३४ हजार २३५ रुपयांचा निव्वळ वाढावा शिल्लक राहिला आहे. यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे दिसून येते.

गाळे नूतनीकरण प्रक्रिया:
बाजार समितीच्या मुख्य यार्डमधील भूखंड कराराचा प्रश्न २००८ पासून प्रलंबित होता. समितीने आता हा प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. एकूण २३५ अडते व व्यापाऱ्यांना नवीन नोंदणी करारनामा करून देण्यात येत आहे. यापैकी ४० करारांचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:
समितीच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या ७७ कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून या कर्मचाऱ्यांना २७ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली असून कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बाजार समितीच्या या सर्वांगीण विकासामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सभापती सुनील महाजन, सदस्य अशोक राठी, इंद्रराज सपकाळे, सचिव कैलास शिंदे, सुनील तापडिया, दीपक महाजन, मांगीलाल जैन, मोहन बडगुजर, राजेंद्र जोशी, विवेक जैन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.



