जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पशुधनाच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली १९६२ हेल्पलाईन सेवा आता पशुपालकांसाठी खऱ्या अर्थाने ‘लाईफलाईन’ ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईल वेटरनरी क्लिनिकच्या समन्वयातून ही सेवा प्रभावीपणे कार्यरत असून, गेल्या वर्षभरात हजारो जनावरांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात या हेल्पलाईनवर एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. त्यापैकी ३,७८,०३५ प्रकरणांमध्ये पशुधनाच्या आरोग्य समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुर्गम व डोंगराळ भागातील ३४,९७९ पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेतला असून, त्यांच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते. हेल्पलाईनवर कॉल प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दीड तासात पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचते. या तत्परतेमुळे ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले असून, त्यात २९,१३० मोठ्या आणि ३५,५६९ लहान जनावरांचा समावेश आहे.
पूर्वी जनावरांना किरकोळ आजारासाठीही दवाखान्यात नेणे वेळखाऊ व खर्चिक ठरत होते. मात्र, आता तज्ज्ञ पशुवैद्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्याने उपचार अधिक सुलभ झाले आहेत. यामुळे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले असून, दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर बनत आहे.
१९६२ हेल्पलाईनद्वारे औषधोपचार, शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, लसीकरण, जंतनाशक उपाययोजना, पशुआहार व आरोग्य मार्गदर्शन, वंध्यत्व तपासणी तसेच आपत्कालीन सेवा अशा विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. याशिवाय व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारेही पशुपालकांना माहिती सहज उपलब्ध होत आहे.
दरम्यान, कॉल सेंटरमध्ये आधुनिक सॉफ्टवेअर, कॉल रेकॉर्डिंग व फीडबॅक प्रणालीचा वापर केल्यामुळे सेवेचा दर्जा उंचावला आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्ला, प्रगत डेटा विश्लेषण व डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीचा समावेश करण्याचे नियोजन असून, यामुळे पशुपालकांना काही सेकंदांत मार्गदर्शन मिळणार आहे.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम होत असून, यामुळे पशुधनाची हानी कमी होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.



