जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या समायोजन बदली प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र हिलाल चित्ते यांनी या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या अन्यायी निर्णयाविरोधात २० एप्रिल २०२६ पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे.
चित्ते यांनी केलेल्या आरोपानुसार, समायोजन बदली प्रक्रियेत एका शिक्षकाने जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षपदाचे तात्पुरते नियुक्ती पत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली. या पत्राचा आधार घेत संबंधित शिक्षकाचे नाव बदली यादीतून वगळण्यात आले आणि त्यांच्याऐवजी चित्ते यांना विस्थापित करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही पारदर्शकता पाळली गेली नाही आणि कुठल्याही प्रकारची सुनावणी न घेता प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. समायोजन समितीने संगनमताने संबंधित शिक्षकाला पाठीशी घातल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी चित्ते यांनी १ एप्रिलपासून गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून तक्रारींची दखल घेतली गेली नाही किंवा चौकशी झाली नाही. त्यामुळे अखेर हतबल होऊन त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
“जोपर्यंत माझी मूळ शाळेवर पुन्हा पदस्थापना होत नाही आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही,” असा स्पष्ट पवित्रा चित्ते यांनी घेतला आहे. शिक्षण विभागाच्या या कार्यपद्धतीमुळे आता शिक्षक वर्गात संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



