Home Cities जळगाव महापालिकेचे पथक उतरले रस्त्यावर, हातगाड्या-टपऱ्या हटवल्या !

महापालिकेचे पथक उतरले रस्त्यावर, हातगाड्या-टपऱ्या हटवल्या !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेने गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेने आज मंगळवारी, २१ एप्रिल रोजी पुन्हा एकदा जोर धरला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आकाशवाणी चौक आणि प्रभात चौकात धडकले. या परिसरातील रहदारीला गंभीर अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाई केली.

शहरातील मुख्य समांतर रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे थाटलेल्या हॉकर्सधारकांच्या गाड्या आणि टपरीधारकांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सज्ज राहून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे रस्त्यावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले असून, यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनाने शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून, अनधिकृत बांधकामे व हातगाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आजच्या कारवाईमुळे संबंधित परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. शहरातील रस्ते मोकळे श्वास घेतील, तोपर्यंत ही धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी मनपाचे हे पाऊल उचलले जात आहे.


Protected Content

Play sound