Home क्राईम एसटी वाहकावर हल्ला करुन १० हजारांची जबरी चोरी ; तिघांविरोधात...

एसटी वाहकावर हल्ला करुन १० हजारांची जबरी चोरी ; तिघांविरोधात गुन्हा दाखल


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेडा येथे एसटी महामंडळाच्या वाहकावर मारहाण करून जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर नारायण पाटील (वय ५२, रा. बेलखेडा), हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ ते १० वाजेच्या दरम्यान ते आपल्या एमएच १९ बीके ९४४८ क्रमांकाच्या दुचाकीने बेलखेडा येथून रावेर बस डेपो येथे ड्युटीसाठी जात होते. दरम्यान, बेलसवाडी गावातील प्रकाश पाटील यांच्या पानटपरीसमोर त्यांना शांताराम राजाराम पाटील यांनी आवाज देत थांबवले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, थांबल्यानंतर शांताराम पाटील यांच्यासह त्यांचे दोन मुलगे जयेश शांताराम पाटील व प्रवीण शांताराम पाटील यांनी एकत्र येत लीलाधर पाटील यांच्यावर चापटा व बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या छाती, पोट व कानावर गंभीर मार बसला असून ते जखमी झाले आहेत.

याचवेळी आरोपींनी लीलाधर पाटील यांच्या उजव्या हातातील प्रत्येकी सुमारे सात ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. तसेच प्रवीण पाटील याने त्यांच्या खिशातील सुमारे १० हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिघांनी मिळून त्यांना पकडून ठेवत ही मारहाण व जबरी चोरी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७३ अंतर्गत मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर भोई करीत आहेत.


Protected Content

Play sound