वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कार पार्किंग करण्यावरून झालेल्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना शनीवारी १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली आहे. या मारहाणीत महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत तुटून नुकसान झाले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील भवानी नगरात दिलीप हरी चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली कार घरासमोर उभी केली होती. यावेळी आरोपी नाझीम गोगाशेट याने “गाडी इथे लावू नकोस, रात्री पाणी पडेल, गाडी खराब होईल,” असे म्हणत वाद घातला. दिलीप चौधरी हे गाडी लावण्याबाबत समजावून सांगण्याच्या प्रयत्न करत असतांना संशयित आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली.

यावेळी वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या दिलीप चौधरी यांच्या पत्नीला देखील सोडले नाही. नाझीमसोबत आलेल्या अज्जू, लाला पठाण आणि ५-६ जणांच्या टोळक्याने दिलीप चौधरी आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला चढवला. या झटापटीत चौधरी यांच्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन तुटून नुकसान झाले. या संदर्भात वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



