जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी आणि दहशत पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या कडक आदेशाचे पालन करत स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त खबऱ्यामार्फत अत्यंत विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, उमर्टी गावाकडून कृष्णपूर ते मामलदे मार्गे चोपड्याच्या दिशेने दोन संशयित व्यक्ती एका मोटारसायकलवरून विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन येत आहेत. त्यांचा उद्देश परिसरात दहशत माजवण्याचा होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचला आणि उमर्टी गावाकडून येणाऱ्या संशयित हिरो होंडा मोटारसायकलला (क्र. MH-१९-S-१४५०) अडवून त्यावरील दोघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची ओळख राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी झाली आहे. अटकेनंतर झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ६९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वळते, पोलीस हवालदार विष्णू बिनहाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने पार पाडली.



