जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। नांद्रा खुर्द येथे पोलीस तक्रार दिल्याच्या रागातून एका २१ वर्षीय तरुणीला तिच्याच घरात घुसून बेदम मारहाण करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी १७ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपींमध्ये ग्रामपंचायत जागेच्या मालकीवरून वाद सुरू होता. यापूर्वी पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी शुक्रवारी १७ एप्रिल रोजी दुपारी पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. संशयित आरोपींनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी तिची नग्नता करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नरेंद्र पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



