Home क्रीडा कोट्यवधींचे खेळाडू बेंचवरच; आयपीएलमध्ये 200 कोटींपेक्षा अधिक ‘बेंच स्ट्रेंथ’

कोट्यवधींचे खेळाडू बेंचवरच; आयपीएलमध्ये 200 कोटींपेक्षा अधिक ‘बेंच स्ट्रेंथ’


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या हंगामात महागडे खेळाडू बेंचवर बसल्याचे चित्र समोर आले आहे. लिलावात कोट्यवधी रुपये खर्च करून संघात घेतलेले अनेक स्टार खेळाडू दुखापत, फॉर्म किंवा संघ संयोजनामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत.

हंगामाचा जवळपास एक तृतीयांश टप्पा पूर्ण झाला असून सर्व संघांनी किमान पाच सामने खेळले आहेत. तरीही 1 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीचे तब्बल 41 खेळाडू एकही सामना खेळलेले नाहीत किंवा केवळ एक-दोन सामन्यांपुरते मर्यादित राहिले आहेत. यामुळे संघांच्या बेंच स्ट्रेंथवर खर्च झालेली रक्कम 200 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.

बेंचवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या संघांमध्ये सनरायझर्स (34 कोटी), लखनऊ (33.20 कोटी), दिल्ली (29.95 कोटी), चेन्नई (29.70 कोटी) आणि कोलकाता (23 कोटी) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या संघांपैकी फक्त दिल्ली संघाने टॉप-4 मध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नई आणि कोलकाता हे संघ शेवटच्या तीन स्थानांवर आहेत. दुसरीकडे, मुंबई संघाकडे फक्त 6.25 कोटींचे खेळाडू बेंचवर असूनही त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसून ते नवव्या स्थानावर आहेत.

तज्ज्ञांच्या मते, महागडी बेंच स्ट्रेंथ म्हणजे संसाधनांचा अपुरा वापर होय आणि त्याचा परिणाम संघाच्या एकूण कामगिरीवर होत आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे संघांना 12 खेळाडू वापरण्याची मुभा मिळाली असली, तरी काही महागडे ऑलराउंडर अपेक्षेनुसार कामगिरी करू शकत नसल्याने त्यांना संधी मिळत नसल्याचे चित्र आहे.

एकूणच, कमी किमतीचे खेळाडू अधिक प्रभावी ठरत असताना महागडे खेळाडू बेंचवरच राहिल्याने या हंगामात संघांच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


Protected Content

Play sound