Home क्राईम चोपडा पो.नि.मधुकर साळवे यांची तडकाफडकी बदली ; गो-रक्षकांशी गैरवर्तन भोवले!

चोपडा पो.नि.मधुकर साळवे यांची तडकाफडकी बदली ; गो-रक्षकांशी गैरवर्तन भोवले!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गो-रक्षकांना चुकीची वागणूक देणे आणि त्यांना ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकी देणे साळवे यांना चांगलेच भोवले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
चोपडा येथील रामपुरा कचरा डेपो परिसरात गो-वंशांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून गो-रक्षकांवर हल्ला झाला होता. या घटनेनंतर गो-रक्षक तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तक्रारदारांवरच गुन्हे दाखल करण्याची भाषा केली आणि त्यांना ‘थर्ड डिग्री’ देण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी साळवे यांच्या निलंबनाची मागणी करत तीव्र आंदोलन केले होते.

राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी या प्रकरणाची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पाच दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत साळवे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन दिवसांत दोन निरीक्षकांवर कारवाई
जळगाव पोलीस दलात गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाच्या बदल्या झाल्या आहेत. १६ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी कावेरी कमलाकर यांनाही नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते, त्यानंतर आता १८ एप्रिल रोजी मधुकर साळवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या जागी रिक्त झालेल्या शहर वाहतूक शाखेची धुरा आता संजय गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


Protected Content

Play sound