जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील भोंदू बाबा प्रकरण, उष्णतेची लाट, विधान परिषद निवडणूक तसेच परिसीमन या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका प्रसामाध्यमांशी बोलतांना मांडली. तसेच त्यांनी भोंदू बाबा प्रकरणात लवकरच कारवाईचे संकेत दिले आहेत. विविध प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
जळगावातील भोंदू बाबा प्रकरणाबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, या बाबत माहिती मिळाली असून संबंधित भोंदू बाबाने पाच ते सहा जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेषतः एका पीडित महिलेची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात जळगाव पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात येणार असून, चौकशी करून संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेबाबतही त्यांनी गंभीर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली असून, पाणीटंचाई, महावितरण तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत नागरिकांना आवश्यक सूचना दिल्या जातील तसेच लोकप्रतिनिधी म्हणूनही स्वतःकडून जनजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या गणित पाहता सात जागा जिंकण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय महायुतीचे नेते घेतील आणि त्या निर्णयानुसार आमदार म्हणून आम्ही काम करू, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक लढवली गेल्यास त्यात रंगत येऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले.
उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य भूमिकेबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. कोणाला निवडणुकीत उतरवायचे किंवा नाही, हा संबंधित पक्षांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयकाबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, परिसीमन कधी होणार याबाबत पूर्वीच निर्णय झाला होता. २००९ मधील परिसीमनवेळीच पुढील २० वर्षांनंतर प्रक्रिया होणार असल्याचे ठरवले होते. त्यामुळे परिसीमन लादले जात असल्याचा आरोप योग्य नसून विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे असे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
परिसीमनानंतर जळगाव जिल्ह्यातील संभाव्य राजकीय स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आमदारांची संख्या १६ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच लोकसभेची एक जागाही वाढू शकते. मात्र ही माहिती अद्याप निश्चित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येकाला मंत्री होण्याची इच्छा असते, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठ घेतात. त्यामुळे या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सूचित केले.



