जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेत जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा राजकीय बदल करण्यात आला असून नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते मा. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदू आप्पा पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक सक्रिय, जनसंपर्कात तत्पर आणि लोकप्रिय समाजसेवक म्हणून ओळखले जातात. कामगार संघटना, वाहतूक क्षेत्र तसेच शिवसेना पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम करून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघटन कौशल्यामुळेच त्यांची या महत्त्वाच्या पदासाठी निवड झाल्याचे पक्षवर्तुळात सांगितले जात आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून वाहतूक क्षेत्रातील समस्या, कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील जनहिताचे मुद्दे सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध घटकांमध्ये त्यांची एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे नंदू आप्पा पाटील हे कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांचे बंधू असून त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीमुळे त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी काळात वाहतूक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नंदू आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



