जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि काही सदस्यांनी संगनमत करून शासनाचा लाखो रुपयांचा विकास निधी हडप केल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने, गुरूवार १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून अखेर संतप्त ग्रामस्थांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीचे डिजिटल काम, शाळा दुरुस्ती, पाण्याचे हौद दुरुस्ती आणि कॉंक्रिटीकरण यांसारख्या कामांच्या नावाने बोगस बिले काढून लाखो रुपये लाटण्यात आले आहेत. प्रत्यक्षात गावात कोणतीही नवीन कामे झालेली नसून, केवळ कागदोपत्री पुरावे सादर करून निधी हडपण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामपंचायतीत ऑपरेटरची नेमणूक नसतानाही त्याच्या नावाचा पगार नियमित काढला जात आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता केवळ कार्यालयात बसून खोटा अहवाल सादर केल्याचा आरोप तक्रारदार पृथ्वीराज दगडू राठोड यांनी केला आहे. तसेच, गटविकास अधिकारी (BDO) साहेबांकडे विचारणा केली असता, त्यांनी “ग्रामसेवक माझी नातेवाईक आहे, तिचे काहीही वाकडे होणार नाही” असे म्हणत आम्हाला धमकावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावातील शिपाई भरतीमध्ये कोणतीही जाहिरात न देता व नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर भरती करण्यात आली आहे. तसेच रेशन दुकान आणि रोजगार सेवक या पदांवरही सरपंचांच्या जवळच्या नातेवाईकांची वर्णी लावण्यात आली आहे. या सर्व गैरप्रकारांमुळे गावाचा विकास पूर्णपणे खुंटला असून, संबंधित दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



