Home Cities जळगाव जळगाव महापालिकेत जैव विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना

जळगाव महापालिकेत जैव विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेत ‘जैव विविधता व्यवस्थापन समिती’ची (BMC) अधिकृत स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी महापौर दीपमाला काळे यांची निवड करण्यात आली असून, शहराच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आता या समितीवर असेल.

समितीच्या सदस्यपदी सुनील वामनराव खडके, अमर उर्फ भागचंद जैन, अर्चना संजय पाटील, संतोष मोतीराम पाटील आणि निकिता दुर्गेश वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून शोभा बाविस्कर या कामकाज पाहणार आहेत.

समितीची प्रमुख कार्ये आणि उद्दिष्टे:

शहराच्या अधिकार क्षेत्रातील जैविक संसाधनांचे संरक्षण करणे आणि त्यांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हे या समितीचे मुख्य कार्य असेल. जैविक संसाधन क्षेत्रात होणाऱ्या बेकायदेशीर प्रवेशावर ही समिती बंदी घालेल. तसेच, राष्ट्रीय जैविक विविधता प्राधिकरण (चेन्नई) आणि महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळाला आवश्यकतेनुसार माहिती व मते सादर करण्याचे काम समिती करेल.
व्यावसायिक कारणासाठी जैविक संसाधनांचा वापर करणाऱ्यांकडून नियमांनुसार संकलन शुल्क आकारणे आणि त्याची वसुली करणे, स्थानिक वैदू तसेच पारंपरिक वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती संकलित करणे आणि या सर्व व्यवहारांची नोंदवही अद्ययावत ठेवणे ही जबाबदारीही या समितीवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय, जैविक विविधतेचा दस्तऐवज तयार करून पारंपरिक ज्ञानाचे जतन करण्यासाठी ही समिती सक्रियपणे कार्य करणार आहे. प्राप्त होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन राज्य व राष्ट्रीय मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाणार आहे.

या समितीच्या माध्यमातून जळगाव शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि स्थानिक नैसर्गिक वारसा जपण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


Protected Content

Play sound