Home क्राईम मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार !

मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. गायत्री चेतन भंगाळे यांनी त्यांच्या विरोधात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत जळगाव पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार सौ. भंगाळे या भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीत वास्तव्यास असून त्या सध्या भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या जात दाव्याची सुनावणी जळगाव येथील जात पडताळणी समितीसमोर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनी त्यांचा दावा फेटाळण्यासाठी विविध पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

भंगाळे यांच्या म्हणण्यानुसार, सावकारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया येथे जाऊन काही कागदपत्रे मिळवली आणि ती समितीसमोर सादर केली. समितीच्या दक्षता पथकाने या कागदपत्रांची पडताळणी करत अहवालही सादर केला. मात्र या अहवालात दाखवलेली शेती व संबंधित मालमत्ता ही भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांची नसून, ती पूर्णपणे इतर व्यक्तींची असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तक्रारीत पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित कागदपत्रांमध्ये ‘कामता प्रसाद नारायण’ या व्यक्तीचे नाव दिसून येते, जे भंगाळे यांच्या कुटुंबाशी संबंधित नसून त्रयस्थ आहेत. नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत चुकीची माहिती तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामता प्रसाद नारायण यांचा जन्म १९५९ साली झालेला असून, भंगाळे यांच्या आजोबांचा जन्म १९२४ साली झाल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय, दुसऱ्याच्या मालमत्तेची कागदपत्रे स्वतःच्या नावावर दाखवून चुकीचा पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामुळे संबंधित व्यक्तींमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे केवळ त्यांचा जात दावा बाधित होत नाही, तर निरपराध व्यक्तींनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे भंगाळे यांनी सांगितले.

या प्रकरणात सौ. रजनी संजय सावकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप करत भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० व १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबत संबंधित व्यक्तींचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तसेच कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीही जोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, जात पडताळणी प्रक्रियेवर याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे भुसावळमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


Protected Content

Play sound