Home प्रशासन किनगावमध्ये बसस्थानकाचा अभाव ; प्रशासनाचे दुर्लक्ष

किनगावमध्ये बसस्थानकाचा अभाव ; प्रशासनाचे दुर्लक्ष


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या किनगाव येथे मूलभूत वाहतूक सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या बसगाड्या येथे थांबत असतानाही अधिकृत बसस्थानक नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

किनगाव हे परिसरातील २२ ते २७ गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून येथून जळगाव, चोपडा, धानोरा व यावल या भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत अनेकजण किनगाववर अवलंबून आहेत. मात्र बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांच्या आडोशाला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

बसस्थानकाच्या अभावासोबतच येथे शौचालयाची सुविधाही उपलब्ध नाही. महिला व पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यामुळे विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बस वेळापत्रक आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी प्रवासी यावल बसस्थानकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, मात्र दिलेला दूरध्वनी क्रमांक सतत नॉट रिचेबल किंवा व्यस्त येत असल्याची तक्रार आहे. या संदर्भात आगार प्रमुखांशी अनेकदा चर्चा झाली असली तरी समस्या कायम असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.

शैक्षणिक कारणांसाठी किनगावहून धानोरा, चोपडा व जळगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सकाळी लवकर यावलहून धुळे गाडी सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्या यावल-वापी आणि यावल-धुळे या गाड्या एकाच वेळी किनगावला येत असल्याने वेळेचे योग्य नियोजन केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकतो तसेच आगाराचे उत्पन्नही वाढू शकते. याशिवाय चोपड्याहून किनगावकडे सायंकाळी ६:४५ नंतर बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना दोन तास प्रतीक्षा करावी लागते व रावेरमार्गे घरी परतावे लागते, ही परिस्थिती बदलण्यासाठी सायंकाळी ६:३० ते ७ दरम्यान एक बस सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

किनगाव बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यावल आगार प्रमुख तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किनगावसह परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.


Protected Content

Play sound