Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये पहिल्यांदाच भव्य ‘आखाजी महोत्सव’ 

अमळनेरमध्ये पहिल्यांदाच भव्य ‘आखाजी महोत्सव’ 

0
124


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील सण-उत्सवांची समृद्ध परंपरा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख करून देण्यासाठी अमळनेर येथे पहिल्यांदाच भव्य ‘आखाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता एलआयसी कॉलनीसमोरील खुल्या भूखंडावर, धुळे रोड येथे हा महोत्सव रंगणार असून खान्देश साहित्य संघाच्या पुढाकारातून हा सांस्कृतिक सोहळा साजरा केला जाणार आहे.

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजेच खान्देशातील ‘आखाजी’ हा केवळ सण नसून तो स्थानिक संस्कृतीचा कणा मानला जातो. याच दिवशी ‘अहिराणी वाङ्मय दिवस’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातून खान्देशी लोककला, पारंपरिक गाणी आणि ग्रामीण जीवनशैलीचे जिवंत दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून अशोक आधार पाटील कार्यभार सांभाळणार आहेत. ग्रामीण संस्कृती आणि आखाजी महोत्सव या विषयावर अहिराणी लेखिका प्रा. डॉ. योगिता पाटील या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

महोत्सवात महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणाऱ्या स्पर्धांमध्ये खापरावरील पूर्ण पोळी बनवणे, झोक्यावर अहिराणी गाणी सादर करणे, गौराई गाणी, घट्यावरची गाणी, पारंपरिक वेशभूषा आणि ‘एक मिनिटात उखाणे’ अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार रुपयांची रोख बक्षिसे तसेच गौराई आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय अहिराणी भाषा व संस्कृतीवर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सहभागींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील बचत गटांकडून अस्सल खान्देशी खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉलही महोत्सवात उभारले जाणार आहेत.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई उदय वाघ, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन या महोत्सवाला लाभणार आहे.

या महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खान्देश साहित्य संघाचे पदाधिकारी, साहित्यिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे खान्देशी संस्कृतीचे जतन आणि प्रसार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound