अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीअंतर्गत जनजागर रथाचे शुक्रवारी, दि. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता विधिवत पूजन करण्यात आले. गणपती बाप्पांच्या स्तवनाने आणि मंत्रोच्चारात पूजा-अर्चा करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी अविनाश खैरनार, उपकृषी अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, अमोल कोठावदे तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागर रथाला शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानांतर्गत शनिवार, दि. 11 एप्रिलपासून अमळनेर तालुक्यातील सहा मंडळांतील 156 गावांना भेट देण्यात येणार असून, प्रत्येक मंडळातील एका प्रमुख गावात भूमीमाता पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.
यापूर्वी 19 मार्च रोजी मंगळग्रह मंदिरात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या वेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांकडून जैविक शेतीचा संकल्प करून घेतला गेला होता. या अभियानाद्वारे रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून सेंद्रिय व पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या या जनजागर मोहिमेची सुरुवात मंगरूळ गावातून होणार असून, जनजागर रथाद्वारे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमी सुपोषणाचे महत्त्व, जैविक शेतीचे फायदे आणि भूमीमातेचे संवर्धन याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दररोज सुमारे 10 गावांना हा रथ भेट देणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



