Home Cities जळगाव खरीप २०२६ नियोजनाला वेग; खत पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

खरीप २०२६ नियोजनाला वेग; खत पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत जिल्ह्यासाठी आवश्यक खत साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी माहिती देताना सांगितले की, कृषी आयुक्तालयाकडून जळगाव जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच जिल्ह्यात खत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून पुरवठा साखळी मजबूत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि खतांची अनावश्यक साठवणूक करू नये. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार आणि पिकांच्या गरजेनुसारच खतांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले.

खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व विक्रेत्यांना आधार लिंकिंग (e-POS) प्रणालीद्वारे खत विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे अचूक बिलिंग होऊन गैरप्रकारांना आळा बसणार आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला.

खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, वाहतूकदार आणि शेतकरी संघटनांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रियेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. पारदर्शक, सुरळीत आणि भ्रष्टाचारमुक्त निविष्ठा वाटपाला प्राधान्य दिले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.


Protected Content

Play sound