Home उद्योग देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर ; हरियाणात यशस्वी ट्रायल 

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर ; हरियाणात यशस्वी ट्रायल 


हरियाणा-वृत्तसेवा । देशातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवून आणणाऱ्या हायड्रोजन ट्रेनने अखेर ट्रॅकवर यशस्वी धाव घेतली असून हरित ऊर्जा वापराच्या दिशेने भारताने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्यांनंतर आता पर्यावरणपूरक आणि भविष्यातील तंत्रज्ञान असलेली ही ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने मोठी झेप घेतली आहे. नवीन रेल्वे मार्ग, वेगवान गाड्या आणि आधुनिक सुविधा यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि जलद झाला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासोबतच आता हायड्रोजन ट्रेनची भर पडल्याने रेल्वे क्षेत्रात तांत्रिक क्रांती होत असल्याचे दिसत आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या या ट्रेनसाठी आवश्यक इंधन स्टेशनही जवळपास पूर्णत्वास आले असून तिची ट्रायल यशस्वीरीत्या पार पडली आहे.

हरियाणातील जिंद आणि सोनीपत या स्थानकांदरम्यान या हायड्रोजन ट्रेनची चाचणी घेण्यात आली. सुमारे 85 किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनने अपेक्षित कामगिरी केली आहे. या ट्रायलच्या आधारे तांत्रिक बाबींचे सखोल विश्लेषण केले जाणार असून काही सुधारणा केल्यानंतर आणखी चाचण्या घेण्यात येतील. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर ही ट्रेन लवकरच नियमित सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

या हायड्रोजन ट्रेनमध्ये एकूण 10 कोच असतील, त्यापैकी 8 डबे प्रवाशांसाठी राखीव असणार आहेत. प्रत्येक डब्यात सुमारे 100 प्रवाशांची क्षमता असेल. वाढते प्रदूषण, इंधनाची टंचाई आणि वीजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जर्मनीमध्ये यापूर्वी दोन कोचची हायड्रोजन ट्रेन सुरू झाली होती, मात्र भारताची ही ट्रेन अधिक लांब पल्ला गाठणार आहे. सध्या ट्रायलमध्ये 85 किमी प्रति तास वेग गाठणारी ही ट्रेन पूर्ण क्षमतेने 105 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. तसेच दररोज सुमारे 360 किलोमीटर अंतर पार करण्याची तिची क्षमता आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभरात हायड्रोजन ट्रेनचा विस्तार करण्याची योजना आहे.

हायड्रोजन ट्रेनसाठी जिंद येथे विशेष प्रकल्प उभारण्यात आला असून इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे ग्रीन हायड्रोजन तयार केले जाणार आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन ब्रॉड गेज मार्गावर धावणार असून तिची क्षमता 2,400 किलोवॅट इतकी आहे. पर्यावरणपूरक, ऊर्जा कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी गेमचेंजर ठरू शकते.


Protected Content

Play sound