जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याने उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील कचरा संकलनाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असताना आणि प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, उपमहापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला अखेर नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत कंपनीला बजावण्यात आलेली ही पहिलीच अधिकृत नोटीस असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शहरातील स्वच्छतेच्या कामात सातत्याने अनियमितता दिसून येत असल्याने उपमहापौर मनोज चौधरी यांनी यापूर्वी अनेकवेळा संबंधित कंपनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीदेखील कचरा संकलनाच्या पद्धतीत आणि व्यवस्थापनात कोणताही ठोस बदल झाला नाही. कंपनीच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब गांभीर्याने घेत उपमहापौरांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कडक शब्दांत निर्देश देऊन तातडीने नोटीस काढण्याची कार्यवाही पूर्ण केली.
शहर स्वच्छता ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा उपमहापौर मनोज चौधरी यांनी यावेळी दिला आहे. कचरा संकलनाच्या कामकाजात येत्या काळात सकारात्मक सुधारणा न झाल्यास संबंधित कंपनीवर केवळ नोटिशीवर न थांबता अधिक कठोर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमहापौरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता शहरातील स्वच्छता मोहिमेला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.



