मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीची गंभीर घटना समोर आली असून, लाठ्या-काठ्यांनी झालेल्या या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहुन (ता. मुक्ताईनगर) येथील एका महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. ती आपल्या पती, मुलगा व मुलीसह राहते आणि शेती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती आपल्या कुटुंबीयांसह घरासमोर अंगणात गप्पा मारत बसली होती.

याच वेळी गावातील ज्ञानेश्वर उखा सोनवणे हा त्या ठिकाणी येऊन त्यांनी जोरात हसत असल्याबद्दल आक्षेप घेत वाद घालू लागला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला. फिर्यादीच्या नात्यातील व्यक्तीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने धमकी देत शिवीगाळ सुरू केली आणि आपल्या साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावले.
थोड्याच वेळात विशाल सोनवणे, विजय सोनवणे, तुळशीराम सोनवणे, कविता सोनवणे, कोमल सोनवणे आणि मनिषा सूर्यवंशी हे लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट हल्ला चढवत उपस्थित कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत फिर्यादीच्या सासूच्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर पती व इतर नातेवाईकांनाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
घटनेदरम्यान गावातील काही महिलांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही चापटाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोठी गर्दी जमली.
गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण आवरले, मात्र हल्लेखोरांनी निघताना पुन्हा धमक्या दिल्या. “आज तुम्हाला वाचवले, पण पुढे हातपाय तोडू,” अशी धमकी देत ते निघून गेले. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी संबंधित सात जणांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत विविध कलमांखाली कारवाई सुरू आहे. ९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:०३ वाजता एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



