Home Cities जळगाव शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव; विकास कामांमुळे नागरिक ‘बेहाल’

शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव; विकास कामांमुळे नागरिक ‘बेहाल’


जळगाव, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : शहरात सध्या शासनाच्या विविध विभागांमार्फत विकास कामांचा धडाका सुरू आहे. मात्र, ही कामे करताना संबंधित यंत्रणांकडून जळगाव महानगरपालिकेला विश्वासात घेतले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ढिसाळ नियोजनामुळे आणि विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे सर्वसामान्य जळगावकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महावितरण यांसारख्या प्रमुख विभागांकडून विविध कामे केली जात आहेत. नियमानुसार, शहराच्या हद्दीत कोणतेही काम करताना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेची परवानगी घेणे किंवा त्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक असते. मात्र, सध्या अनेक ठिकाणी ही प्रक्रिया धाब्यावर बसवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा किंवा ड्रेनेज लाईनचा विचार केला जात नाही. यामुळे अनेकदा नवीन रस्ते खोदले जातात किंवा पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडतात. महावितरणकडून वीज खांब लावताना महापालिकेच्या नियोजित विकास आराखड्याची माहिती घेतली जात नाही. अनेकदा रस्त्याच्या मधोमध किंवा चुकीच्या ठिकाणी खांब उभे केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दोन विभागांच्या वादात किंवा समन्वयाअभावी रस्ते उखडलेले राहणे, धूळ साचणे आणि वाहतूक कोंडी होणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेला विश्वासात न घेता सुरू असलेल्या या कामांमुळे सरकारी निधीचाही अपव्यय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकदा रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कामासाठी तो खोदला जात असल्याने ‘काम करा आणि भरा’ असा प्रकार जळगावात पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound