जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर व महाराष्ट्रभरातील ब्राह्मण समाजासाठी आनंदाचे आणि उत्साहाचे क्षण लवकरच येणार आहेत. यंदाच्या वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ या विशेष निमित्ताने भव्य आयोजनाचे नियोजन करण्यात आले असून, यावेळी हजारोंच्या संख्येने समाजबंधु, भगिनी एकत्र येऊन उत्सव साजरा करणार आहेत.
सकल ब्राह्मण समाजाची एकता वाढवण्यासाठी आणि विविध शाखा, भाषा भेद बाजूला सारून एकत्र येण्याच्या उद्देशाने बहुभाषिक ब्राह्मण संघाने या जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. हे यंदाचे १७वे वर्ष असून मागील सतराव्या वर्षी प्रमाणेच, यंदाही उत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या आयोजनासाठी ४०० हून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत असून दानशुरांच्या अर्थदानामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होत आहे.

जन्मोत्सवाची सुरूवात रविवार, दिनांक ०५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने झाली. पुढील रविवार, दिनांक १२ एप्रिल रोजी महाबळ चौकातून सायंकाळी ५ वाजता विराट मोटारसायकल रॅली निघणार आहे. रॅली काव्यरत्नावली चौक, रिंगरोड मार्गे शाश्त्री टॉवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक आणि विर सावरकर पुतळ्यावरून पोलिस मल्टीपरपज हॉलपर्यंत पोहचेल. याच ठिकाणी सायंकाळी ७ वाजता दानदाते व श्रमदाते गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य ब्राह्मण एकता दिवसाचा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता ग्राम दैवत श्री राम मंदिरात परशुराम पूजन करून दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत सालाबादा प्रमाणे दिव्य भगवान परशुराम रथासह ढोल, ताशा, लेझिम, दांडिया पथके सहभागी होतील. महिलांचे तलवार बाजजी, दांडपट्टा प्रात्यक्षिक आणि विविध पथकांच्या सरावाला हनुमान जयंतीपासून सुरूवात झाली असून, यंदाही हा कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. शोभायात्रेचे समापन शिवतिर्थावर होईल.
जन्मोत्सवात नवीन उपक्रम आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश यंदाही करण्यात आला आहे. मागील वर्षी ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरूपी मूर्ती विनामूल्य देण्यात आल्या होत्या. यंदा निमंत्रण पत्रिकेऐवजी २८ पानांची मराठी नववर्ष दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे, ज्यात ब्राह्मणांच्या मुळकुळी पुरूषांची माहिती तसेच समाजोपयोगी माहिती समाविष्ट केली आहे. ही दिनदर्शिका प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचवली जात आहे आणि ज्या कुटुंबांना पोहचली नसल्यास शिवतिर्थावर उपलब्ध करून दिली जाईल.



