रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून पीपल्स बँकेच्या मॅनेजरच्या घरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असताना चोरट्याने ही संधी साधत घर फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीपल्स बँकेचे मॅनेजर प्रकाश पाटील यांच्या राहत्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले असताना घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील नेमकी किती रोकड, सोनं-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप पाटील यांच्या घरातही चोरीची घटना घडली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा त्याच बँकेशी संबंधित अधिकाऱ्याच्या घरावर चोरी झाल्याने शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे चोरट्यांचा बेमालूम वावर आणि नियोजनबद्ध हालचाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “चोरीची घटना घडली आहे, मात्र मी सध्या बाहेरगावी आहे. माझी पत्नी घरी पोहोचली असून तपास करून नेमकी माहिती देऊ.” असे त्यांनी स्पष्ट केले.



