यावल, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील डोंगर कठोरा येथे बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संस्कारांच्या जडणघडणीसाठी दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ‘आदिशक्ती मुक्ताई बालसंस्कार शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. विविध ज्येष्ठ महंतांच्या आशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ह.भ.प. काशिनाथ महाराज कोळन्हावी, ह.भ.प. भरत महाराज बेळीकर, ह.भ.प. धनराज महाराज अंजाळे, महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, ह.भ.प. दिनकर महाराज (डोंगर कठोरा) आणि ह.भ.प. दत्तात्रय महाराज (डोंगर कठोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे. १५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना भगवद्गीता पठण, मंत्र ध्यान, कीर्तन, धर्मशिक्षण, गायन, मृदंग वादन, काकडा भजन आणि हरिपाठ यांसारख्या आध्यात्मिक विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे यात कोणत्याही मुला-मुलीकडून शुल्क घेतले जाणार नसून प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे, तसेच वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे आणि जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे (वढोदा) उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या मुलींनी येताना स्वतःचे ताट, ग्लास आणि अंथरुण-पांघरुण सोबत आणणे आवश्यक आहे, तसेच मृदंग शिकू इच्छिणाऱ्या मुलांनी स्वतःचा मृदंग सोबत आणावा, असे सूचित करण्यात आले आहे.
शिबिराचा समारोप १५ मे रोजी अत्यंत उत्साहात होणार आहे. या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन होईल, त्यानंतर दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कालावधीत मनोहर झांबरे, इच्छाराम बाऊस्कर, रवींद्र पाटील, नितीन पाटील यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची सेवा दिली जाणार आहे.
या उपक्रमासाठी ह.भ.प. वैभव महाराज, उदय महाराज, रवींद्र महाराज, कुंदन महाराज, प्रवीण महाराज व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच जय भवानी डीजे साउंड व समस्त डोंगर कठोरा ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी आणि पालकांनी आपल्या पाल्यांसह या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ह.भ.प. खुशाल महाराज आणि ह.भ.प. दिनेश महाराज यांनी केले आहे.



