Home आरोग्य बहुविद्याशाखीय वैद्यकीय कार्यशाळेत ६०० प्रतिनिधींचा सहभाग

बहुविद्याशाखीय वैद्यकीय कार्यशाळेत ६०० प्रतिनिधींचा सहभाग


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित बहुविद्याशाखीय विषयावरील कार्यशाळेला डॉक्टर, विद्यार्थी आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष ४०० प्रतिनिधी उपस्थित राहिले, तर २०० जणांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतल्याने या कार्यशाळेला व्यापक प्रतिसाद लाभला.

स्टुडंट कौन्सिलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सीएमई कार्यशाळेचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, एमएमसी निरीक्षक डॉ. दिलीप ढेकळे, अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रय्या कांते, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत गुडेट्टी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक उपचार पद्धतींमध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांनी एकत्रित काम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा समन्वयातून रुग्णांना अधिक अचूक आणि प्रभावी उपचार मिळू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमधून नव्या संशोधनाची माहिती आत्मसात करून ज्ञानवृद्धी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यशाळेत विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना बहुविद्याशाखीय समन्वयाचे महत्त्व, आधुनिक निदान पद्धती, उपचारातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधनाची दिशा यावर सखोल चर्चा केली. जटिल आजारांवरील उपचार करताना विविध विभागांतील डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करणे किती गरजेचे आहे, यावरही भर देण्यात आला. या समन्वयामुळे उपचार प्रक्रियेत अचूकता वाढते आणि रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कार्यशाळेमुळे वैद्यकीय विद्यार्थी आणि तरुण डॉक्टरांना नव्या संशोधन, तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींबाबत अद्ययावत माहिती मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा कार्यशाळांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत गुडेट्टी, स्टुडंट कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound