Home Cities जळगाव महापौर दीपमाला काळे यांचा निर्णय; धोकादायक विहिरी त्वरित बंद करण्याचे आदेश

महापौर दीपमाला काळे यांचा निर्णय; धोकादायक विहिरी त्वरित बंद करण्याचे आदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज, प्रतिनिधी : शहरातील विविध भागांत असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या उघड्या आणि असुरक्षित विहिरींमुळे जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर लक्ष केंद्रित करत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना लेखी पत्र दिले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

शहरात पाणीपुरवठ्यासाठी अनेक सार्वजनिक विहिरींचा वापर केला जातो, मात्र सद्यस्थितीत यातील अनेक विहिरी उघड्या आणि असुरक्षित अवस्थेत आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका महापौरांनी पत्राद्वारे अधोरेखित केला आहे.

महापौरांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार, शहरातील मनपा मालकीच्या सर्व उघड्या विहिरींची तातडीने पाहणी करून त्या बंदिस्त करणे आवश्यक आहे. तसेच, ज्या विहिरी सध्या वापरात नाहीत आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत, अशा विहिरी त्वरित बुजवून सुरक्षितता निश्चित करावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. केवळ सार्वजनिक विहिरीच नव्हे, तर खाजगी मालकीच्या ज्या विहिरी उघड्या आणि असुरक्षित आहेत, त्यांच्या मालकांना नोटिसा बजावून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही महापौरांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ठेवून महापौरांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेनंतर आता महानगरपालिका प्रशासन यावर किती वेगाने पावले उचलते, याकडे संपूर्ण जळगावकर जनतेचे लक्ष लागले आहे.

 

 


Protected Content

Play sound