Home मनोरंजन ‘हमारा बजाज’चा अमर आवाज हरपला ; प्रसिद्ध जिंगल गायक विनय मांडके यांचे...

‘हमारा बजाज’चा अमर आवाज हरपला ; प्रसिद्ध जिंगल गायक विनय मांडके यांचे निधन 


मुंबई –  वृत्तसेवा । भारतीय संगीत आणि जाहिरात क्षेत्रात आपल्या वेगळ्या आवाजाने छाप सोडणारे प्रसिद्ध गायक विनय मांडके यांचे निधन झाले असून, ९० च्या दशकातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘हमारा बजाज’चा आवाज कायमचा हरपला आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील दादर येथील निवासस्थानी १ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.

विनय मांडके यांनी आपल्या कारकिर्दीत पार्श्वगायन आणि जिंगल्सच्या माध्यमातून मोठी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी आवाज दिला, तर सात हजारांहून अधिक जाहिरातींसाठी जिंगल्स गायले. ‘हमारा बजाज’ या लोकप्रिय जिंगलमुळे ते घराघरांत पोहोचले आणि त्यांच्या आवाजाने एक संपूर्ण पिढी भारावून गेली. त्यांच्या निधनानंतर पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.

जाहिरात आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं. कल्याणजी-आनंदजी, बप्पी लहिरी आणि शंकर-जयकिशन यांसारख्या नामवंत संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. तसेच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं असून, त्यांच्या आवाजामुळे त्यांना ‘लक्ष्याचा आवाज’ अशी ओळखही मिळाली होती.

विनय मांडके यांनी केवळ स्टुडिओपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर त्यांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांमधूनही आपल्या कलेचा ठसा उमटवला. त्यांच्या गायनाने प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केलं. व्हीआयपी लगेज, एमडीएच मसाला, विको वज्रदंती, लिप्टन टी, टाटा स्टील, प्रेस्टिज कुकर, लाइफबॉय, निरमा, व्हिल, ओके साबण आणि फेव्हिकॉल यांसारख्या अनेक प्रसिद्ध जाहिरातींमध्ये त्यांनी आवाज दिला होता.

त्यांच्या निधनानंतर संपूर्ण संगीत विश्वातून हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Protected Content

Play sound