
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या तिरळेपणा मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार नेत्रोपचाराची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य व जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हे १९९ वे तिरळेपणा मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. १ व २ एप्रिल रोजी रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, आजपासून प्रत्यक्ष शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. नि.तू. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखील चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
तिरळेपणा शस्त्रक्रियेतील अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर स्वतः सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांच्या सोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही कार्यरत असून, शिबिरात अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जात आहेत. रुग्णालयातील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर आणि डॉ. निखील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिर सुरळीतपणे पार पडत आहे.
या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असून, १५० हून अधिक रुग्णांची तपासणी पूर्ण झाली आहे. दि. ३ ते ५ एप्रिल दरम्यान गरजू रुग्णांवर मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही मोठी संधी ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. तिरळेपणा दूर करण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध झालेली ही सुविधा रुग्णांसाठी दिलासादायक ठरत असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



