Home Cities मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांचे धाडस ! अंतुर्ली फाट्याजवळ स्वतः ट्रकची काच फोडून...

आमदार चंद्रकांत पाटील यांचे धाडस ! अंतुर्ली फाट्याजवळ स्वतः ट्रकची काच फोडून चालकाचे वाचवले प्राण


मुक्ताईनगर,लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजकारण आणि समाजकारणात अनेकदा नेत्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते, मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका अपघातग्रस्त चालकाचे प्राण वाचवून खऱ्या अर्थाने ‘जनतेचा नेता’ कसा असावा, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

नेमकी घटना काय?
आज आमदार चंद्रकांत पाटील हे आपल्या मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. हा दौरा सुरू असतानाच अंतुर्ली फाट्याजवळ एक भीषण ट्रक अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एक मोठा ट्रक रस्त्यावर पलटी झाला होता आणि त्यामध्ये चालक गंभीर अवस्थेत अडकून पडला होता.

स्वतः फोडली ट्रकची काच!
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच, आमदार साहेबांनी ताफा थांबवून क्षणाचाही विलंब न करता ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रकचा दरवाजा जाम झाला होता आणि आतून चालक रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी याचना करत होता. अशा वेळी आमदारांनी कोणाचीही वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला आणि ट्रकची काच फोडून अत्यंत काळजीपूर्वक चालकाला बाहेर काढले.

तात्काळ वैद्यकीय उपचार
चालकाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर आमदार पाटलांनी तातडीने रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाशी संपर्क साधला. जखमी चालकाला स्वतःच्या देखरेखीखाली प्राथमिक उपचार मिळवून दिले आणि पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात रवाना केले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कृतीचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी, “संकटात धावून जाणारा असा कर्तव्यदक्ष आमदारच आमचा खरा नेता आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या घटनेमुळे आमदार साहेबांच्या कार्यतत्परतेची आणि माणुसकीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound