भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत निलेश कांतीलाल पाटील यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव शहराध्यक्षपदाची घोषणा आज अधिकृतरीत्या करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनंतर मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी निलेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

निलेश पाटील यांच्या नियुक्तीमुळे भडगाव शहरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे संघटन आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निलेश पाटील यांचे अभिनंदन केले. माजी आमदार दिलीप वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल शिंदे, भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी, जिल्हा बँक संचालक प्रताप पाटील, जिल्हा सरचिटणीस अमोल पाटील, जिल्हा दूध संघ संचालक पुनम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष बन्सीलाल परदेशी, अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस नूतन पाटील यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.



