एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील गावांना मतदार यादी कार्यक्रम विशेष मोहिम अंतर्गत व तालुक्यातील काही गावांमधून अवैध वाळु वाहतुकीच्या तक्रारी संदर्भात एरंडोल विभागीय प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांसोबत चर्चा केल्या.
मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील टोळी, जवखेडे बु., जवखेडे खु., विखरण, चोरटक्की, रिंगणगाव, पिंपळकोठे प्र.चा., टाकरखेडा, वैजनाथ, सावदे चा., खेडी, काढोली, पिंपळकोठे बु., खर्ची खु., रवंजे बु., पिंप्री बु., पिंप्री प्र.चा. या गावातील बी.एल.ओ. ना त्यांच्या मतदान केंद्रावर भेट घेतली व मतदान केंद्राची पाहणी केली. गावातील नागरिकांना भेटुन चर्चा केली. तसेच तालुक्यातील खेडी, काढोली, वैजनाथ, टाकरखेडे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील व गावकऱ्यांना प्रत्यक्ष भेटुन गौण खनिज अवैध वाहतुक आढळल्यास फोन करावा असे सांगितले. याबरोबर याभागातील गौण खनिज तपासणी केली. लक्ष्मीबाई सोनवणे जवखेडे बु.,हिलाल मराठे (चव्हाण) टोळी, नाना पाटील वैजनाथ, मनिषा पाटील टाकरखेडे, सुभाष पाटील जवखेडे खु.,विनोद पाटील कढोली या सरपंचांना समक्ष भेटुन मतदार यादी नोंदणी व अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत चर्चा केली.