जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते श्री क्षेत्र शिरसाळा दरम्यान आयोजित पदयात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली असून, हजारो भाविकांच्या सहभागाने या धार्मिक सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटे ३ वाजता श्री सिद्धेश्वर हनुमानाच्या दर्शनाने या पदयात्रेची यशस्वी सांगता झाली.
जय भद्रा बहुउद्देशीय संस्था (पैलवान हुप ग्रुप) यांच्या वतीने आयोजित ही पदयात्रा चैत्र शुद्ध १३, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी जळगाव येथून प्रारंभ झाली होती. विविध गावांमधून मार्गक्रमण करत भाविकांनी भक्तिभावाने आणि उत्साहात प्रवास पूर्ण केला. यात्रेदरम्यान “जय हनुमान” च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

ही पदयात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. यामध्ये ऊर्जा व इंधन बचतीचा संदेश देण्यात आला तसेच अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ मदत करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
यात्रेदरम्यान स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन करत भाविकांच्या सुरक्षिततेची, आरोग्याची आणि सोयीसुविधांची विशेष काळजी घेतली. पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि विश्रांतीची व्यवस्था यामुळे पदयात्रा सुरळीत पार पडली. शिस्त आणि संयम राखत भाविकांनी मोठ्या जबाबदारीने सहभाग नोंदवला.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश तायडे (नीलू आबा) यांनी श्री क्षेत्र शिरसाळा येथे भेट देत पदयात्रेत सहभागी भाविकांची विचारपूस केली. त्यांनी संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करून आयोजकांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांचा उत्साह अधिक वाढल्याचे दिसून आले.
या पदयात्रेसाठी नाताभाऊ सोनवणे मित्र परिवार तसेच इंजिनिअर सागर शामकांत सोनवणे (नगरसेवक, मनपा जळगाव) यांचे सहकार्य लाभले. आयोजकांमध्ये योगेश गालफाडे, सागर भाऊ पैलवान आणि निखिल भाऊ पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.



