मुंबई-वृत्तसेवा | देशात डिजिटल व्यवहारांची झपाट्याने वाढ होत असताना, आता या व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठा निर्णय लागू करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 पासून यूपीआय (UPI) द्वारे होणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी नवीन नियम लागू झाला असून, याचा थेट परिणाम कोट्यवधी यूजर्सवर होणार आहे.
भारतातील बहुतांश नागरिक आज शॉपिंग मॉल, किराणा दुकान, भाजी मार्केटपासून ते मोठ्या व्यवहारांपर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पेमेंटचा वापर करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत.

नवीन नियमानुसार, आता फक्त यूपीआय पिन टाकून व्यवहार पूर्ण होणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, पिनसोबतच यूजर्सना आणखी एक सुरक्षा पायरी पूर्ण करावी लागणार आहे.
या 2-स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये ओटीपी (OTP), फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक यापैकी कोणतीही एक प्रक्रिया असू शकते. यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित होणार असला तरी, पेमेंट पूर्ण होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.
या नव्या नियमाचा परिणाम PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या लोकप्रिय यूपीआय अॅप्सच्या यूजर्सवर होणार आहे. व्यवहार करताना आता अतिरिक्त व्हेरिफिकेशन करावे लागणार असल्याने काही प्रमाणात व्यवहाराची गती कमी होऊ शकते, मात्र फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण अधिक मजबूत होणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या डिजिटल फ्रॉडच्या घटनांमुळे हा निर्णय आवश्यक होता. त्यामुळे यूजर्सनी आपल्या मोबाईलमधील सर्व यूपीआय अॅप्स अपडेट ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून नवीन सुरक्षा प्रणाली सुरळीतपणे कार्य करू शकेल.



