Home आंतरराष्ट्रीय एआय डेटा सेंटर्समुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान : संशोधन

एआय डेटा सेंटर्समुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान : संशोधन


मुंबई-वृत्तसेवा | आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे आता पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ज्या ठिकाणी AI डेटा सेंटर्स कार्यरत आहेत, त्या परिसरातील तापमान सरासरी 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असून, या नव्या घटनेला शास्त्रज्ञांनी ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ असे नाव दिले आहे.

संशोधनात मागील दोन दशकांतील सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून असे आढळले की, एखाद्या भागात डेटा सेंटर सुरू झाल्यानंतर तेथील तापमानात अचानक वाढ होते. काही भागांमध्ये ही वाढ 2.07 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवली गेली असून, काही ठिकाणी ती तब्बल 9.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे, या उष्णतेचा प्रभाव केवळ डेटा सेंटरच्या परिसरापुरता मर्यादित राहत नाही. संशोधनानुसार, डेटा सेंटरपासून सुमारे 10 किलोमीटरपर्यंतच्या परिसरातही तापमान वाढलेले दिसून येते, ज्यामुळे स्थानिक वातावरणावर व्यापक परिणाम होत आहे.

यापूर्वी ‘अर्बन हीट आयलंड’ ही संकल्पना परिचित होती, ज्यामध्ये शहरांमधील काँक्रीट आणि वाढती लोकसंख्या यामुळे तापमान ग्रामीण भागांच्या तुलनेत 4 ते 6 अंशांनी जास्त असते. मात्र, आता AI इन्फ्रास्ट्रक्चरही या यादीत सामील झाले आहे. मोठ्या प्रमाणात वीज आणि कॉम्प्युटिंग पॉवर वापरणाऱ्या डेटा सेंटर्समधून निर्माण होणारी उष्णता थेट वातावरणात सोडली जाते, ज्यामुळे स्थानिक तापमान वाढते.

‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ म्हणजे डेटा सेंटर्समधून बाहेर पडणारी अतिरिक्त उष्णता परिसराचे तापमान वाढवते. AI मॉडेल्स चालवणारे शक्तिशाली सर्व्हर्स आणि कूलिंग सिस्टिम्स २४ तास गरम हवा बाहेर टाकत असतात. यामुळे शहरी भागांमध्ये नवीन प्रकारचे ‘हीट आयलंड’ तयार होत असून, हा डिजिटल युगातील एक नव्या प्रकारचा थर्मल प्रदूषणाचा धोका मानला जात आहे.

या अभ्यासानुसार, जगभरातील सुमारे 34.4 कोटी लोक अशा भागांमध्ये राहतात, जे या डेटा सेंटर्सच्या उष्णतेच्या प्रभावाखाली आहेत. यामुळे केवळ आरोग्य समस्याच वाढणार नाहीत, तर घरांना थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापर आणि खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

संशोधकांनी स्पेनमधील अरागॉन, मेक्सिकोतील बाहियो आणि ब्राझीलच्या ईशान्येकडील प्रदेशात केस स्टडी केली. या ठिकाणी डेटा सेंटर्सच्या समूहामुळे तापमानात असामान्य वाढ दिसून आली. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

तज्ज्ञांच्या मते, पुढील दशकात डेटा सेंटर उद्योग जगातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरणार आहे. AI साठी लागणारी प्रचंड वीज लवकरच उत्पादन क्षेत्राच्या वापरालाही मागे टाकू शकते. सध्या बहुतेक डेटा सेंटर्स जीवाश्म इंधनावर आधारित वीज वापरत असल्याने उष्णता आणि प्रदूषण दोन्ही वाढत आहेत.


Protected Content

Play sound