जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तोंडापूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शैक्षणिक सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मोठी व गंभीर स्वप्ने पाहण्याची सवय लावण्याचे आवाहन प्रमुख पाहुणे सुहैल अमीर शेख यांनी केले. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, शिक्षक, पालक तसेच विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मौलाना अब्दुल रशीद, जाकीर शेख, इमरान शेख, झकी सर, अय्यूब सर, अकील सर, मोहसिन सर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात शैक्षणिक वातावरणासोबत सामाजिक जागरूकतेचा संदेश देण्यात आला.

सुहैल अमीर शेख यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी व्यक्तीची क्षमता त्याची स्वतःची ओळख निर्माण करते. देशाची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्रगती आवश्यक असून, आपली ओळख जपत उल्लेखनीय कामगिरी करणे गरजेचे आहे. हेच समाज आणि राष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणारे मूलभूत तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध नाटिकांद्वारे सामाजिक संदेश सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. ओवैस शेख आणि डॉ. फरहान कुरेशी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला.
मुख्याध्यापक इस्माईल सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नासीर शेख, युनूस सर, इमरान सर, वसीम सर, आमिर शाह सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मझहर सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन अमीर शाह सर यांनी मानले.



