
तेहरान- वृत्तसेवा । अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र आणि व्यापक होत असल्याचे संकेत मिळत असून, या युद्धात रशियाच्या जवळच्या सहयोगी असलेल्या चेचेन सैन्याच्या संभाव्य सहभागामुळे जागतिक तणाव शिगेला पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती केवळ हवाई हल्ल्यांपुरती मर्यादित न राहता जमिनीवरील युद्धाच्या दिशेने झुकत असल्याचे चित्र दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेचेन्यांचे प्रमुख रमजान कादिरोव यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर ते इराणच्या सशस्त्र दलांच्या मदतीसाठी तत्काळ रणांगणात उतरतील. कादिरोव यांच्याशी निष्ठावान असलेल्या या सैन्याने या संघर्षाला ‘धार्मिक युद्ध’ किंवा ‘जिहाद’ असे संबोधत, ही लढाई चांगले विरुद्ध वाईट अशी असल्याचे म्हटले आहे. इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, युद्धाचा आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत या युद्धावर ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च झाला असून, ट्रम्प यांनी अरब राष्ट्रांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मात्र, अमेरिकेने जमिनीवर सैन्य उतरवण्याचा निर्णय घेतल्यास आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून चेचेन सैन्य रणांगणात उतरल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांनाही फटका बसला आहे. इराणमधील झंजन शहरातील ‘आजम हुसैनीया’ या प्रसिद्ध धार्मिक स्थळावर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात नुकसान झाले असून, येथील सोन्याचा घुमट उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याचदरम्यान, इराणने आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. कोणत्याही प्रकारची लष्करी माहिती किंवा छायाचित्रे शत्रू देशांना पुरवल्यास थेट फाशीची शिक्षा दिली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
दरम्यान, इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इराणचे नौदल कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे इराणमधील संताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चेचेन सैन्याच्या या आक्रमक भूमिकेमुळे रशिया थेट या संघर्षात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, हा संघर्ष केवळ प्रादेशिक मर्यादेत न राहता जागतिक पातळीवरील मोठ्या युद्धात परिवर्तित होऊ शकतो, अशी भीती पाश्चात्य देशांकडून व्यक्त केली जात आहे.



