Home प्रशासन नगरपालिका ग्रामरोजगार सहाय्यकांचा राज्यव्यापी कामबंदचा इशारा 

ग्रामरोजगार सहाय्यकांचा राज्यव्यापी कामबंदचा इशारा 


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करत १ एप्रिलपासून कामबंद आंदोलनचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने पारोळा येथे गटविकास अधिकारी डॉ. भुषण कदम यांना निवेदन देण्यात आले. राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांचे फिक्स मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामरोजगार सहाय्यकांना आकृतिबंध समायोजन करून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विविध सवलती लागू कराव्यात, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात आणि सेवेत सातत्य राखून पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या देखील संघटनेने केल्या आहेत.

संघटनेने आणखी एक महत्त्वाची मागणी करताना सांगितले की, सेवेत असताना अपघात किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गटविमा योजना लागू करावी. या सर्व मागण्यांबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.

दरम्यान, शासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामविकास कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवेदनावेळी सुरेश पाटोळे यांच्यासह हिरालाल पाटील, नाना पाटील, संजय पाटील, मोतीलाल पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, दिप्तेश चौधरी, सैदाणे आदींसह तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.


Protected Content

Play sound