पत्रकारांच्या आरोग्य आणि मनोरंजनाचा विचार करून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणत अनोखा उत्साह निर्माण केला. २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. तालुकानिहाय पत्रकार संघांसह जळगाव शहरातील विविध संघ, संपादक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाचे संघ यांचा समावेश होता.
स्पर्धेत ६ षटकांच्या स्वरूपात सामने खेळविण्यात आले. चार दिवसांत चुरशीचे आणि रोमांचक सामने पाहायला मिळाले. ९९ धावांची सर्वोच्च तर २० धावांची किमान धावसंख्या नोंदली गेली. जवळपास ५०० पेक्षा अधिक पत्रकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आयोजकांनी खेळाडू, प्रेक्षक आणि कुटुंबीयांसाठी जेवण, पाणी, सरबत आणि लाईव्ह प्रक्षेपणाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर पाटील, वाल्मिक जोशी, प्रवीण सपकाळे, चेतन वाणी, जकी अहमद, भगवान सोनार, वसीम खान, सचिन गोसावी, राकेश वाणी आणि यामिनी कुलकर्णी यांच्यासह सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले होते. चार दिवसांच्या कालावधीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी डॉ. रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघांसह उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळविण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांनी विशेष रंगत आणली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय आणि आयोजन समिती विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय या सामन्यांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या नेतृत्वाखालील संघांनी विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.
या स्पर्धेमुळे पत्रकारांमध्ये एकोपा, उत्साह आणि मैत्रीचे वातावरण निर्माण झाले असून ‘पत्रकार प्रीमियर लीग’ ही स्पर्धा पुढील काळातही अधिक मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.