पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विविध समाजाभिमुख मागण्यांसाठी समता सैनिक दलाने आज जोरदार निषेध व धिक्कार मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालय गाठत उपोषणाला सुरुवात केली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.
समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, शहर अध्यक्ष गंगाराम तेली यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चामध्ये विविध सामाजिक प्रश्नांवर संताप व्यक्त करण्यात आला.

मागण्यांमध्ये विशेषतः मागासवर्गीय महिलेच्या प्रेतयात्रेला विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित स्मशानभूमीच्या लगतची गावठाण जागा त्वरित दफनभूमीत वर्ग करण्यात यावी आणि तेथील अतिक्रमण हटवून सुरक्षितता भिंत उभारावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय स्थानिक समाजबांधवांना पोलीस संरक्षण देण्याची, वाणेगाव येथील सामाजिक तणावासाठी जबाबदार ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचेही निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करून त्याला तात्काळ निलंबित करावे, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील नांद्रे, लोहार, खडकदेवळा खुर्द आदी ठिकाणच्या समाज मंदिरांवरील अतिक्रमण हटवून त्यांची स्वच्छता व दुरुस्ती करून ती समाजाच्या ताब्यात देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
एकूण आठ प्रमुख संविधानिक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळेच प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाभिमुख प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर दबाव वाढवला आहे.



