Home क्राईम भीषण अपघातात वृध्दाला चिरडणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

भीषण अपघातात वृध्दाला चिरडणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या वराड बुद्रुक येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत बशीरशहा मकदुल शहा फकिर या ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालक आणि मालक या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील रहिवाशी बशीरशहा मकदुल शहा फकिर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला होते. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास बशीरशहा फकिर हे गावातील हनुमान मंदिराजवळील रस्त्यावरून पायी जात होते. याचवेळी (एमएच ४७ एएस ५९४८) क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने आला आणि त्याने बशीरशहा यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. डंपर चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दापोरी, ता. एरंडोल) याच्याकडे जड वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हता, तसेच त्याला डंपर चालवण्याचे प्रशिक्षणही नव्हते. तरीही डंपर मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) याने अपघाताची शक्यता माहित असतानाही डंपर नितीनच्या हाती सोपवला. मृताचा मुलगा युसूफशहा याकुबशहा फकिर याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहे.


Protected Content

Play sound