भुसावळ, प्रतिनिधी | कामिका एकादशीनिमित्त आज (दि.२८) लाखो वारकरी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आल्याने गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, आदी जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातूनही पायी दिंडी, पालखी सोहळे मुक्ताईच्या दर्शनाच्या ओढीने कोथळी येथे आले आहेत.
वारकऱ्यांमध्ये अशी धारणा आहे की, आषाढी एकादशीला पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर कामिका एकादशीला आदिशक्ती श्री संत मुक्ताईचे दर्शन झाल्यावरच पंढरपूरची वारी व पांडुरंगाचे दर्शन पूर्ण झाल्याचे साफल्य मिळते. त्यामुळे पंचक्रोशितील वारकरी व भाविक मुक्ताईच्या चरणी लिन होत असतात.
भु-वैकुंठ पंढरपुर येथुन विठुरायाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना कमला एकादशीला आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूर पावत नाही, म्हणून आज तब्बल दोन लाख भाविक येथे मुक्ताईचे दर्शन घेणासाठी आलेले आहेत. त्यातच मुक्ताईनगर जवळ राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समाजसेवक बबलु सापधरे, अॅड. राहुल पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी देशमुख, पोलीस निरीक्षक शिंदे, उप निरीक्षक साळुंखे, पो.कॉ. गणेश चौधरी, मुकेश घुगे आदी प्रयत्न करीत होते.