चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका शेतकरी दांपत्याने आपल्याच शेतात एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय-२७) दोन्ही रा. शिवापूर तांडा ता.चाळीसगाव अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर शिवारात राहणाऱ्या जाधव दांपत्याने घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर असलेल्या आपल्या स्वतःच्या शेतात हे टोकाचे पाऊल उचलले. शेतातील एका उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने दोघांनी गळफास घेतला. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

मृत जाधव दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही मुले शिक्षणासाठी गावाबाहेर राहत असल्याने घटनेच्या वेळी ती घरी नव्हती. ऐन उमेदीच्या काळात आई-वडिलांनी अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांची टोकाचे पाऊल का उचलले याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण सपकाळे हे करीत आहे.



